खेड भोस्ते घाटात सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे ऐकायला मिळत आहेत. ज्या योगेश आर्याला भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं स्वप्न पडलं होतं त्याला पोलिसांनी चौकशीसाठी आता ताब्यात घेतलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वतः योगेश आर्याची चौकशी केली आहे. तसंच पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी जाऊनही भेट घेतली आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि श्वान पथकानेही ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला तिथली पाहणी केली आहे. खेड पोलीस ठाण्यात योगेश आर्याची चौकशी सुरू आहे. खेड पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक तसंच इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या भोस्ते घाटात एक मृतदेह आढळला होता. योगेश आर्या नावाच्या सावंतवाडीच्या तरुणाच्या स्वप्नात भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं येत होतं. याची फिर्याद योगेश आर्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा तिथे खरंच मृतदेह आढळला. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली
होती.मात्र पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तपासाचा वेग वाढवला आहे..